Categories: Featured आरोग्य सामाजिक

राज्यानंतर केंद्राचेही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

मुंबईलॉकडाऊनचा निर्णय आणखी वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. गर्दी टाळून कोरोनाला लगाम घालण्याच्या कठोर निर्णयानंतरही याकाळात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे, त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय वाढवण्याचा विचार काही राज्यांनी केंद्र सरकारला कळवला आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील लॉकडाऊनबाबत टप्प्याटप्याने निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. याशिवाय अन्य काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची आवश्यकता असल्याची भूमिका केंद्राला कळवली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात विचार करत आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना १५ एप्रिलनंतर लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी देशहिताचा विचार करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. कोरोनामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. देशातील काही राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असेही जावडेकरांनी स्पष्ट केले होते.

देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकार काही राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि  दिल्ली याठिकाणी दिवसागणिक परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कठोर निर्णयाची अंमलबजावणी करण्याची दाट शक्यता आहे.  

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: lockdown increase