नवी दिल्ली| शेतकऱ्यांसाठी सरकारने किसान रेल्वेची वारंवारिता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले होते. दरम्यानच्या काळात सरकारने किसान रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ही रेल्वे आठवड्यातून एकदा नाशिकमधील देवळालीहून मुझफ्फरपूरपर्यंत जात होती. दरम्यान आता या रेल्वेची उपयुक्तता ध्यानात घेत रेल्वेने, किसान रेल्वेची वारंवारता आठवड्यातून दोनदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयीची माहिती सीआरचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतूक एकदम स्वस्त आणि कमी वेळेत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी याहून सोपे साधन नाही. रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरले आहे. २१ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या सहाय्याने देवळाली ते मुझफ्फरपूरपर्यंत महाराष्ट्रातून २३५ टन माल वाहून नेला होता. ज्यामध्ये डाळिंबासह लिंबू, फुलकोबी, मासे, मिश्र भाज्या, मिरची तसेच इतर कृषी उत्पादनांचा समावेश होता.
सोलापूर येथील बेलवंडी स्टेशनवर पहिल्यांदाच शेतातील धान्याचा किसान रेल्वेमध्ये साठा करण्यात आला. यामुळे या प्रदेशातील शेतकरी फार आनंदी झाले आणि त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. किसान रेल्वेबरोबर शेतकऱ्यांना इतर सेवा सुद्धा पुरवल्या जातील यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, असे मध्य रेल्वेचे अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.