Categories: राजकीय

चंदगड मतदार संघातून डॉ. प्रकाश बांदिवडेकरांनी केली उमेदवारी घोषित

कोल्हापूर ।२८ सप्टेंबर। राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक पक्ष आपले उमेदवार घोषित करत आहेत. यातच कोल्हापूरच्या चंदगड मतदार संघातून डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांनी उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे चंदगडमध्ये खळबळ उडाली आहे.

चंदगड विधानसभा मतदार संघातून प्रकाश बांदिवडेकरांनी उमेदवारी केली घोषित
पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या बांदिवडेकर खून खटल्यातून डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ते समाजकारणात सक्रिय झाले आहेत. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील सात जणांचे यात बळी गेले होते. त्या प्रकरणाचा विषय काढला तरी आज अनेकांची बोबडी वळते. त्यामुळे डॉ. बांदिवडेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आता चंदगडमध्ये खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्यात बांदिवडेकर यांचा मोठा वचक आहे. यापूर्वी छोटा राजन टोळीशी बांदिवडेकर यांचे वैरात्वाचे संबंध होते, अशी चर्चा सुद्धा ऐकायला मिळते. प्रकाश बांदिवडेकर यांचे नाव जरी काढले तरी अनेक जण घाबरत होते, अशी या तालुक्यातील परिस्थिती होती. पण बांदिवडेकर खून खटल्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर ते आता सामाजिक कार्यात सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी आपली चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप, शिवसेना या दोन्हीपैकी एका पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

न्यूज सोर्स- ईटीव्ही भारत

Team Lokshahi News