Categories: बातम्या राजकीय

चंद्रकांत दादांचं महाविकास आघाडीला पुन्हा आव्हान; म्हणाले हिंमत असेल तर…

मुंबई | खुल्या मनाने पराभव मान्य करण्याऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा विरोधकांवर निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वी आम्ही एकटे भारी पडू असे म्हणणाऱ्या पाटील यांनी आता विरोधकांना हिंमत असेल तर एकटे एकटे लढा असे आव्हान दिले आहे. भाजपाला निवडून द्यायचंच नाही हा एकच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचेही पाटील म्हणाले. पदवीधर मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मी महाविकास आघाडीला चॅलेंज देतो हिंमत असेल तर एकटे एकटे लढा असे ते म्हणाले. आमच्या उमेदवारांचा जो पराभव झाला आहे त्याच आम्ही चिंतन करू असे सांगत प्रत्येक पक्षाची वोट बॅंक असल्यामुळे आमचा पराभव झाल्याचे पाटील म्हणाले.

आपला मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना सोबत असती तर बळ मिळालच असतं पण ते सोबत नाहीत. त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत असे ते म्हणाले. शिवसेनेला या निवडणुकीत अक्षरक्ष: भोपळा मिळाला असून पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही त्यांना उमेदवार निवडून आणता येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

आमची स्ट्रॅटेजिक चूक कुठे झाली याचा विचार करू – फडणवीस

भाजपच्या सगळ्या नेत्यांनी प्रचंड मेहनत केली, आमची स्ट्रॅटेजिक चूक कुठे झाली? की तीन पक्ष एकत्र आल्यावर जे होते ते झालं?  पुढच्या वेळी याबाबत निश्चित विचार करू अशी प्रतिक्रिया या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Team Lokshahi News