Categories: राजकीय

कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून येण्याची शाश्वती नसल्यानेच चंद्रकांत दादांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा घाट?

मुंबई।३० सप्टेंबर। लोकांमधून निवडून या आणि मग बोला म्हणून सातत्याने विरोधकांच्या टिकेचा सामना कराव लागणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पक्षाने कोथरूड मतदार संघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. कोल्हापूर जिल्हा हा त्यांचा होमग्राऊंड असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा प्रभाव पाहता स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यातच त्यांना निवडून येण्याची शाश्वती नसल्याने त्यांना पक्षाने पुणे जिल्ह्यातून उतरवण्याचे निश्चित केल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी अशी भाजपच्या नेत्यांची देखील इच्छा होती. पंरतु  कोल्हापूरातील राजकीय परिस्थिती पाहता पक्षाने हा निर्णय घेतल्याने युती झाली अथवा नाही झाली तरी चंद्रकांतदादांचा निभाव लागणार नाही असा संदेश मात्र या निमित्ताने सर्वत्र गेल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सध्या पाटील यांच्यासाठी मतदारसंघामधील अंदाज घेण्यासाठी ही खेळी असल्याचीही चर्चा असून अद्याप भाजपने अधिकृतरित्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. रविवारी (२९ सप्टेंबर) यादी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

भाजपच्या संसदीय समितीची दिल्लीत काल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात महाराष्ट्रातील उमेदवरांची नावे निश्चित करण्याचे काम करण्यात आली. या बैठकीतच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदार संघ निवडल्याची चर्चा आहे. कोथरूड मतदार संघात २०१४ च्या निवडणूकीत प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरूध्द ६४ हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. सध्या या मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवारच नसल्याचे दिसत आहे. 

दरम्यान चंद्रकांत पाटील ज्या मतदार संघातून निवडणूकीला उतरतील त्या मतदारसंघात पाटील यांच्याविरूध्द माझी उमेदवारी असेल असे सातत्याने सांगणारे स्वाभिमानीचे राजू शेट्टी आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: कोथरूड विधानसभा कोल्हापूर चंद्रकांत पाटील पुणे भाजप विधानसभा विधानसभा २०१९