मुंबई। चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत. पुन्हा सत्ता आल्याखेरीज दिल्लीत जाणार नाही असे फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे पाटलांनाच सांगितले आहे, असं मत शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त केलं आहे.
पाटील यांना महाराच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत आहे व त्यातून त्यांचे इशारे व धमक्या सुरू आहेत. अर्थात दिल्लीने मार्गदर्शन केल्याशिवाय पाटील असे इशारे देणार नाहीत. फडणवीस दिल्लीला गेल्यावर राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवायचे अशी पाटलांची इच्छा आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
सरकार फार काळ चालणार नाही वगैरे भविष्य पाटील यांच्याप्रमाणे फडणवीस यांनीही मध्यंतरी सांगितले. हे सरकार स्वतःच्याच बोजाने पडेल, असे फडणवीस सांगतात. ते बरोबर आहे. कारण त्यांचे सरकार पंक्चर झाले ते स्वतःच्याच बोजामुळे. त्यांच्या सरकारने महाराष्ट्राचे ओझ्याचे आणि बोजाचे गाढव केले होते, असं म्हणत अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
विरोधी पक्षाने त्यांच्या भूमिका जोरकसपणे मांडायला हव्यात. पण आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका करायचीच नाही व कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करू असे वारंवार सांगणे हे मोदी यांच्या पक्षाला शोभणारे नाही, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.