कोल्हापूर। एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारकांना धान्य पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असताना ग्रामीण भागात मात्र स्वस्त धान्य दुकानदारांकडून लोकांना नाडले जात असल्याचे चित्र आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांच्या कुटूंबात सन २०१४ नंतर वाढीव सदस्य आहेत, आणि शिधापत्रिकेवरही नावे चढवण्यात आली आहेत, अशा वाढीव सदस्यांचे रेशन मात्र दुकानदारांकडून दिले जात नसल्याचे दिसत आहे.
आमच्या प्रतिनिधीने याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, कोल्हापूर जिल्ह्याच्या गगनबावडा तालुक्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याने, शासनाकडून २०१४ पासून वाढीव सदस्यांसाठी धान्यच मिळत नसल्याचे कारण दिले. २०१४ पासून वाढीव सदस्यांची यादीच अपडेट केली नसल्याचे उडवाउडवीचे उत्तरही यावेळी मिळाले. मात्र ही यादी आत्तापर्यंत का अपडेट केलेली नाही याची विचारणा केली असता याचे कारण देणे मात्र टाळल्याचे दिसून आले.
स्वस्त धान्य दुकानात धान्य नेण्यासाठी येणाऱ्या लोकांनी देखील अशाच तक्रारी करण्यास सुरवात केली असून कुटूंबात, वाढीव सदस्य असून देखील गेली ४/५ वर्षे वाढीव सदस्यांचा शिधा नाकारला जात असल्याचे सांगितले. शिधापत्रिकेवर नाव असून देखील गेली कित्येक वर्षे सुरू असलेला हा काळाबाजार ग्रामीण जनता मुकाट्याने सहन करत असल्याचेच यावरून स्पष्ट होते.
एकीकडे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ दि. १ ते १० एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील १ कोटी ९ लाख २९ हजार ६९४ शिधापत्रिकाधारकांना तब्बल २८ लाख, ७२ हजार २८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती देत आहेत. मात्र हे धान्य खरोखरच लाभार्थ्यांच्या घरी पोहचले आहे का प्रश्न यातून निर्माण होत आहे. यामुळे प्रशासनाने या गोष्टींची वेळीच दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिधापत्रिकाधारकांकडून केली जात आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ दि. ३ एप्रिलपासून टप्याटप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ०८२ मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.