Categories: कृषी बातम्या

मुख्यमंत्री ठाकरेंकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बांधावरच धनादेशाचे वाटप

सोलापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्त सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. याठिकाणी दाखल झाल्यानंतर ठाकरे यांनी पिकांची आणि नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना बांधावरच नुकसान भरपाई पोटी प्रत्येकी २५ हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप केले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळीच दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही होते. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून त्यांनी गावकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावक-यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. तसेच हवामान विभागाने येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, त्यामुळे घाई घाईत नुकसान भरपाईचा निर्णय न घेता शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असेही स्पष्ट केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यात रामपूर येथे नुकसानीची पाहणी करून ठाकरे यांनी गावक-यांशी संवाद साधला. यावेळी संकटग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांच्या मदतीचे धनादेश ठाकरे यांनी वितरीत केले. याप्रसंगी संवाद साधताना गावक-यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर अक्कलकोट येथील भोसले संस्थानकालीन हत्ती तलावाचीही पाहणी केली. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर येथेही ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. 

दरम्यान, केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे येणे आहे. हे येणे वेळेत दिले गेले तर सध्याच्या अतिवृष्टी व पुराच्या आपत्तीत केंद्राकडे मदत मागावी लागणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. राज्य आणि केंद्र असा दुजाभाव होऊ नये, असेही त्यांनी सुनावले. अतिवृष्टी आणि पुराची आपत्ती मोठी आहे. या संकटात राज्य सरकार आपली जबाबदारी अजिबात झटकणार नाही. हे सरकार जनतेचे आणि शेतकऱ्यांचे आहे. कोणालाही वा-यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी ठाकरे यांनी दिली.

Team Lokshahi News