मुंबई | कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीने पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी यासंदर्भात जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा प्रतिनिधींशी ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामुहीक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवाडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.