Categories: राजकीय

मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्या मुलाच्या मंत्रीपदासाठी कापला ‘या’ आमदाराचा पत्ता?

मुंबई।३० डिसेंबर। आज महाविकास आघाडीसरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सोहळा पार पडला. यामध्ये एकूण ३६ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळाच्या यादीत ऐनवेळी शिवसेनेचे युवा आमदार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून यासाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील राऊत यांचा मंत्रीपदाचा पत्ता कापल्याचे बोलले जात आहे. यामुळे नाराज झालेल्या सुनील राऊत यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाच राजीनामा देण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.

सुनील राऊत हे शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात मोलाची भुमिका बजावलेल्या खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत. त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येणार अशी राजकीय वर्तुळातून चर्चा होती. पंरतु मंत्रीपदाच्या जाहीर झालेल्या यादीनंतर सुनील राऊत यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली होती. सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी ते २०१४ मध्येही निवडून आले होते. सुनील राऊत हे मुंबईबाहेर असून त्यांचा मोबाइलही नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना व्यासपीठावर पाहुण्यांचे आदरतिथ्य करणारे संजय राऊत यांनी देखील ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला गैरहजेरी लावली. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते. परंतु, संजय राऊत यांनी आपण शासकीय सोहळ्याला जात नसतो असे म्हणत वेळ मारुन नेली आहे.  

Team Lokshahi News