Categories: Featured

अतिवृष्टी संदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

मुंबई | मागील चार दिवसात होणाऱ्या  मुसळधार पावसामुळे कोकण किनारपट्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा बैठक घेतली आहे. यावेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व तेथील नियंत्रण कक्षांशी मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला. त्यांनी अतिवृष्टीमध्ये  कोरोनाशी मुकाबला करीत  योग्य ती काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री  ठाकरे यांनी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आहे.  तसेच कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या आहेत. पुढील हवामानाचा अंदाज घेऊन  तयारी करण्याचे आदेश ही  त्यांनी यावेळी दिले आहेत. 

कोल्हापूरसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना
कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवली, रायगड येथे कुंडलिका या  नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. राज्यात एनडीआरएफची एकूण १६ पथके तैनात असून कोल्हापूरमध्ये ४ पथके  तैनात आहेत. तरी ही प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तसेच जिल्ह्यात पुर परिस्थिती असल्यास त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करीत, नागरिकांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पुणे विभागीय व कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

पाण्याचा निचरा, पडलेली झाडे काढणे याला प्राधान्य 
प्रथमच काल जेजे रुग्णालय येथे तळमजल्यावर पाणी भरले होते परंतु लगेचच यंत्रणेने त्या पाण्याचा निचरा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही त्याचप्रमाणे मुंबईत हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा रोड, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, गोल देऊळ, महर्षी कर्वे रोड, पोलीस वसाहत, भायखळा, खेतवाडी आदि ठिकाणी साचलेले पाणी पालिकेने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून काढले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या होत्या ते तोफ्डून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे त्याचीही माहिती त्यांनी घेतली. 

Team Lokshahi News