Categories: Featured

कोल्हापूर : ‘या’ पाच ऑक्सीजन उत्पादक कंपन्या अधिग्रहीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर | जिल्ह्यातील पाचही ऑक्सीजन उत्पादक कंपन्या आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यान्वये अधिग्रहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

निर्देश दिलेल्या पाचही कंपन्यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचा पुरवठा करावयाचा असून, अन्य कारणासाठी तसेच इतर जिल्ह्यात पुरवठा करण्यासाठी एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांची परवानगी घ्यायची आहे. परवानगी न घेतल्यास अशा कंपन्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. याबाबत आज रात्रीपासूनच कंपन्यांच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्तीची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

कोल्हापूर ऑक्सीजन कागल, के नायट्रोजन प्रा लि-शिरोली, महालक्ष्मी गॅसेस यड्राव इचलकरंजी, देवी इंडस्ट्रीयल गॅस गोकूळ शिरगाव आणि चंद्रा उद्योग शिरोली अशा पाच ऑक्सीजन उत्पादक कंपन्या आहेत. या पाचही कंपन्यांचा अधिग्रहण केलेल्या मध्ये समावेश आहे.

या कंपन्यांच्या ठिकाणी एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी इंगळे यांच्या नियंत्रणाखाली तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याची सूचनाही दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचा पुरवठा या कंपन्यांकडून होतोय का, याची पाहणी हे कर्मचारी करतील. यासाठी आज रात्रीपासूनच या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना दिली आहे. या कंपन्यांवर याबाबतचे आदेश उद्या बजावण्यात येतील.

Team Lokshahi News