Categories: Featured

आता पहिली ते दहावी ‘हा’ विषय सक्तीचा, उल्लंघन केल्यास होणार भरमसाठ दंड

उल्लंघन केल्यास शाळाप्रमुखांना १ लाखाचा दंड

मुंबई। राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असून याबाबतचं विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे.  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता सर्व शाळांना अधिनियमाचे पालन करावे लागेल. उल्लंघन करणाऱ्या शाळाप्रमुखांना १ लाख रुपये दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली. आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्याला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं. वर्षा गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री गायकवाड यांनी दिली.

Team Lokshahi News