Categories: राजकीय

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्याचे संकेत; कार्यकारिणीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे

नवी दिल्ली | काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करणार असल्याची माहिती असून काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. याबाबत लवकरच राहुल गांधी  स्वत: घोषणा करतील, असेही सांगितले जात आहे. 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन दोन गट पडले आहेत. एका गटाची मागणी सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाची मागणी राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी आहे. एकूणच काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावं यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य आग्रही आहेत.

सोनिया गांधी १४ मार्च १९९८ ते १६ डिसेंबर २०१७ पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधींनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. 

Team Lokshahi News