Categories: राजकीय

कॉंग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत नवे जुने सगळे प्रस्थापित राजकीय घराण्यातीलच

मुंबई। २९ सप्टेंबर। कॉंग्रेसने घटस्थापनेचा मुहुर्त साधत आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ५१ जणांची यादी जाहीर करण्यात आली असून यात बहुतांशी प्रस्थापितांनाच संधी दिल्याचे दिसून येत आहे. 

यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असे कॉंग्रेसकडून वारंवार सांगितले जात होते, परंतु उमेदवार घोषित करताना मात्र कॉंग्रेसने नवीन चेहऱ्यांऐवजी बहुतांशी प्रस्थापितांनाच संधी दिल्याचे दिसत आहे. या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि काँग्रेसच्या निवडणूक समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं नाव पहिल्या यादीत असून ते अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत.

  • दरम्यान कराड दक्षिण मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार अशी अटकळ बांधण्यात येत होती, परंतु त्यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उतरवण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबईतील भांडूप पश्चिम मतदारसंघातून सुरेश कोपरकर, अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव, चांदिवलीमधून मोहम्मद आरिफ खान, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे, वांद्रे पूर्वमधून झिशन सिद्दीकी, धारावीमधून वर्षा गायकवाड, सायन कोळीवाडातून गणेश यादव, मुंबादेवीमधून अमिन पटेल, कुलाबामधून अशोक जगताप यांना तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून रोहित साळवे, मीरा भाईंदरमधून सय्यद हुसैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस मतदारसंघातून विद्यमान आमदार विश्वजित कदम, जतमधून विक्रम सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

पुण्यातील पुरंदरमधून संजय जगताप, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून माजी मंत्री रमेश बागवे, भोर येथून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातील विद्यमान आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमधून शिरीष चौधरी, नागपूर पूर्वमधून डॉ. नितीन राऊत, वरोरामधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या उमेदवारीवर नजर टाकली असता जे प्रस्थापित पैसा खर्च करू शकतात, पूर्ण ताकतीने निवडणूक लढवू शकतात अशांनाच संधी दिल्याचे दिसत आहे. लोकसभेत सपाटून मार खावा लागल्यामुळे कॉंग्रेसने धोका न पत्करण्याची भुमिका घेतली असून फारसे बदल करणे टाळल्याचे दिसत आहे.

Team Lokshahi News