Categories: Featured

कोरोनामुळे कळे येथील एकाच कुटूंबातील दोन सख्या भावांसहित आईचाही मृत्यु

पन्हाळा | पन्हाळा तालुक्यातील कळे येथील देसाई कुटूंबातील दोन भावांसहित त्यांच्या आईचा कोरोना सदृश्य आजारामुळे मृत्यु झाला आहे. यामुळे देसाई कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दीपक पांडुरंग देसाई (वय ४२), सागर पांडुरंग देसाई (वय ३९) व त्यांची आई मालुबाई पांडुरंग देसाई (वय ७०) अशी त्यांची नावे आहेत. वडील पांडुरंग तुकाराम देसाई व तिसरा भाऊ जलराज यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दीपक देसाई यांच्या वडणगे येथील बहिण सुवर्णा सदाशिव जौंदाळ (वय ५५) यांना सदर घटना समजली. रात्री पावणेनऊच्या सुमारास हृदय विकाराचा तीव्र धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.

देसाई कुटूंबियांचा कळे येथे बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. गत आठवड्यात त्यांची चुलती अनुसया यशवंत देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्याला काही नातेवाईक आले होते. उत्तरकार्यानंतर त्यांच्यापैकी वडणगे येथील महिला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर देसाई कुटुंबातील सदस्यांना त्रास जाणवू लागला. पांडुरंग तुकाराम देसाई, मालुबाई पांडुरंग देसाई हे पती-पत्नी व दीपक, सागर व जलराज (पन्हाळा पोलिस कर्मचारी) या तिन्ही मुलांनी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात तपासणी केली. त्यानंतर सर्वजण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांनी स्वॅब दिला नाही. पांडुरंग तुकाराम देसाई, मालुबाई पांडुरंग देसाई हे पती-पत्नी व त्यांची मुले दीपक,सागर व जलराज यांना त्रास जाणवत असल्याने एचआरटीसीवर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान, दीपकची प्रकृती बिघडली. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ सागर शेजारच्या बेडवर असल्याने त्याने आपला भाऊ दीपकचा मृत्यू झाल्याचे पाहिल्याने त्याचीही प्रकृती खालावत गेली व साडेअकराच्या सुमारास धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वीच उजलाईवाडी येथील दवाखान्यात उपचार सुरू असलेली त्यांची आई मालुबाई यांचाही साडेनऊ च्या सुमारास मृत्यू झाला.

हे ही वाचा – कोल्हापूर : दोन भाऊ आणि चुलतीचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यु; घटनेची माहिती समजताच तिनेही सोडले प्राण!

याबाबत कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विद्यानंद शिरोलीकर यांच्याकडे चौकशी केली असता मयतांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. दीपक व सागरचा परिसरात मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • तब्येतीचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्या कुटुंबातील आणखीन पंधराजणांनी ता. १५, १७ व १८ रोजी तपासणी केली असता त्यांच्यातील एका डॉक्टरसह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आठजण निगेटिव्ह आले आहेत.
दिपक देसाई
सागर देसाई

पंचायत समितीने पन्हाळा तालुक्यात ता. ११ ते २० स्पटेंबर पर्यंत जनता कर्फ्यू पुकारला होता. कळे बाजारपेठेत सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, पण गेल्या तीन दिवसांपासून दुकानदारांनी मुदत संपण्यापूर्वीच दुकाने उघडली. बाजारपेठेत गर्दी होती. आजच्या या घटनेने हबकून सर्व दुकानदारांनी पटापट आपली दुकाने बंद केली आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असून लोकांच्या मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकिय उपचार घेणे आणि कुटूंबाची सुरक्षिता जपणे अतिशय गरजेचे असल्याचे दिसत आहे.

Team Lokshahi News