Categories: Featured सामाजिक

Corona: लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अमोल देशिंगकर यांच्याकडून डवरी समाजाला धान्यवाटप

कोल्हापूर। सध्या कोरोनाविषाणूमुळे जगभर संकट उभे ठाकल्याने लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मोठे हाल सुरू झालेत. कोल्हापूरातील नाथपंथी डवरी समाजाचेही या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे मोठे हाल सुरू असून त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती ध्यानात घेत सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राजारामपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल देशिंगकर आणि त्यांच्या पत्नी दिपाली देशिंगकर यांनी या समाजाला स्वखर्चाने २०० किलो धान्यवाटप केलय. 

दौलतनगरच्या लगत असलेला डवरी समाज हा कष्टकरी समाज म्हणून ओळखला जातो. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरच सायंकाळी ज्यांच्या घरी चूल पेटते अशा पैकी हा समाज आहे. या समाजात आरोग्य, शिक्षण व आर्थिक विकासाचा कायमच अभाव असल्याचे पहायला मिळते. सध्या कोरोना विषाणूने जगभर महासंकट उभे केलेले असताना अशा हातावर पोट असलेल्या नाथपंथी डवरी समाजाचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. डवरी समाजाची सध्याच्या परिस्थितीतील गरज ओळखून अमोल देशिंगकर व दिपाली देशिंगकर या दांपत्याने स्वखर्चाने या समाजाला जवळजवळ २०० किलो धान्य वाटप केले आहे. आपले सामाजिक दातृत्व ओळखून देशिंगकर दांपत्याने केलेल्या या कार्याचे कौतुक समाजात होत आहे. 

देशिंगकर दांपत्याने केलेली मदत काही दिवसांसाठी या समाजाचा प्रश्न सोडवू शकते. परंतु अद्याप लॉकडाऊनचा बराचसा काळ बाकी आहे. त्यामुळे पुन्हा या समाजासमोर दररोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी शासनाने व समाजिक संस्थानी पुढाकार घेऊन मदत करावी अशी मागणी या समाजाच्यावतीने होत आहे.  

  • “कोरोनामुळे देशात ओढवलेली परिस्थिती पाहता समाजातील बहुतांशी वर्गावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून आम्ही स्वखर्चाने कोल्हापूरातील डवरी समाजातील लोकांना अल्पशी मदत देऊ केलीय. यामुळे या समाजाचा तात्पुरता प्रश्न सुटण्यास मदत झाली असली तरी आणखी मदतीची गरज येत्या काळात भासणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि संस्थानी या समाजाला आपआपल्या परीने मदत करावी”अमोल देशिंगकर (सामाजिक कार्यकर्ते)
Lokshahi News