Categories: Featured

Corona Effect: पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द कापड बाजारपेठ गांधीनगर बंद!

कोल्हापूर।वंदना आहुजा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद ठेवण्यात आले आहे. हा बंद तीन दिवस ठेवला जाणार आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गांधीनगरातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दुपारपासून हा बंद पाळण्यात आला असून दिवसभरातील अंदाजे पाच कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती आहे. 

याबाबत शुक्रवारी पुज्य सिंधी सेंट्रल पंचायत, गांधीनगर, होलसेल, रिटेल व्यापारी, पोलिस आणि नागरिक यांची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेतला असून उद्या रविवारी रात्रीपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. गांधीनगर मध्ये परदेशातून आलेले काही स्थानिक नागरिक असून त्यांना पोलिस आणि प्रशासनाने होम क्वारंटाईन केलेले आहे. 

गांधीनगर ही कापड व्यापाराबरोबरच इतर वस्तूंची बाजारपेठ म्हणून देखील प्रसिध्द आहे. कापड, सॅनिटरी, इलेक्ट्रॉनिक, किराणा, प्लायवूड, फूटवेअर, इलेक्ट्रिक साहित्य, कटलरी यासारख्या वस्तूंची बाजारपेठ म्हणूनही गांधीनगरची ओळख आहे. सर्व व्यापारपेठ बंद करून गांधीनगरातील व्यापाऱ्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी चांगले पाऊल उचलले आहे. सोमवार पासून मोठे व्यापारीही ३१ मार्च पर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवणार असल्याची माहिती आहे. 

Team Lokshahi News