Categories: आरोग्य सामाजिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक पहाडासारखी उभी आहे, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बँक देणार असल्याचेही, त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .

कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचा निर्णय व्हावा, अशी ईच्छा पत्राद्वारे व्यक्त केली आहे. बँकेच्या शुक्रवारी (ता.२५) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीस ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे पत्राव्दारे आपले मत संचालक मंडळासमोर ठेवले आहे.

बँकेचे अधिकारी व कर्मचारी अनुक्रमे, संजय आण्‍णासो पाटील रा. टाकळी, शाखा – अकिवाट, अशोक भाऊ पाटील रा. हडलगे, शाखा- महागाव, पांडुरंग मुरलीधर शेंडगे रा. कुंभोज, शाखा- हातकणंगले व प्रशांत प्रकाश नाईक रा. कागल, केंद्र कार्यालय, कोल्हापूर हे या महामारीमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेत.

यापूर्वीच बँकेने दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपये एलआयसीकडून विमाकवच घेतले आहे. तसेच बँकेने नफ्यातून पाच लाख रुपये व ईडीएलआय योजनेतून ( एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम) सहा लाख रुपये असे एकूण २१ लाख रुपये कुटुंबीयांना मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याशिवाय, अनुकंपा तत्त्वावर लवकरच त्यांच्या वारसांना सेवेत रुजू करून घेण्याचे एकमताने ठरवले आहे. यापुढे फक्त जे या महामारीने आजारी पडतील, त्यांना दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी बँकेच्या कल्याण मंडळाकडून दोन लाख रुपयेपर्यंत दवाखान्याच्या खर्चासाठी विमा दिला जाणार आहे. हा विषय तसेच या महामारीने आजारी पडून बरे होऊन घरी परतले आहेत व दवाखान्याचा खर्च स्वतः भागवला आहे. त्यांना बँकेच्या वैद्यकीय सहायता निधी योजनेमधून दोन लाखापर्यंतचा योग्य खर्च देण्याचा विषय आजच्या विषय पत्रिकेवर आहे.

यासंदर्भातील योग्य ती नियमावली बँक लवकरच जाहीर करणार आहे. तरी, कृपया संचालक मंडळाने दोन्ही विषयांना एकमताने मान्यता द्यावी, अशी विनंती मुश्रीफ यांनी पत्राव्दारे केली आहे.

Team Lokshahi News