Categories: आरोग्य सामाजिक

‘त्या’ आरोग्य सहाय्यकाच्या चुकीमुळे गगनबावडा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; कारवाईची मागणी

गगनबावडा | गगनबावडा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत असलेल्या आरोग्य सहाय्यकावर कारवाई करण्याची मागणी मांडूकली येथील ग्रामपंचायत सदस्या स्नेहा सूर्यकांत पडवळ यांनी केली आहे. २४ जुलै रोजी मांडुकली (ता.गगनबावडा) येथील मयत वृद्ध आणि त्याचा भाऊ या दोघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम निवडे येथील आरोग्य सहाय्यकाने केले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मांडुकली येथील एका वृद्ध व्यक्तीची बायपास शस्त्रक्रिया कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात करण्यात आली होती. दरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्या सेवेसाठी त्यांचा भाऊही रूग्णालयात उपस्थित होता. सदर रूग्णालयातील एका व्यक्तीस कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने दवाखान्यातील सर्व रूग्णांबरोबर त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या व्यक्तींचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु आरोग्य सहाय्यकाने मांडूकली येथील रूग्णाचा आणि त्याच्या भावाचा अहवाल येण्याअगोदरच तो निगेटिव्ह असल्याचे सांगितल्याने मयत रूग्णावर मांडूकली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 

मयत व्यक्तीचा अहवाल आरोग्य सहायक हिरोजी गुरव यांनी निगेटिव्ह सांगितल्याने लोकांनी भीती न बाळगता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान मयत व्यक्ती आणि त्याचा भाऊ यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याचे स्पष्ट झाल्याने गावातील लोकांबरोबरच अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ 49 लोकांची तपासणी केली. यामध्ये बधितांची संख्या वाढायला लागली असून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. केवळ प्रशासनातील एका व्यक्तीच्या चुकीमुळे तालुक्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून अनेकांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.

Team Lokshahi News