कोल्हापूर | कोरोनाबाधित रूग्णांवर येत्या काळात घरच्याघरीच उपचार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन विचार करत असल्याची माहिती आहे. ज्या बाधितांच्या घरी स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र शौचालय असेल अशा रूग्णांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर अशा कोरोनाबाधित रूग्णांवर डॉक्टरांचे पथक उपचार करणार आहे. यासाठीचे नियोजन प्रशासन पातळीवर केले जात आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रूग्णांना नियोजनबध्द उपचार, सकस आहार, योग्य व्यायाम याबाबी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासन तयारी करत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या दररोज २०० ते ३०० रूग्णांची भर पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरानाबाधितांचा एकूण आकडा ३०९२ च्या घरात गेलाय. दिवसेंदिवस रूग्णांची वाढती संख्या प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरत असून त्यासाठी दवाखान्यांपेक्षा घरच्या घरी चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करता येऊ शकते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घरचे लोकही सामाजिक अंतर राखून रूग्णाला वेळेत जेवण देणे, आवश्यक औषधे पुरवणे, प्रतिकारक शक्ती वाढवणारा पोषक आहार, फळे, दूध, अंडी यासारख्या गोष्टी देऊ शकतील. यामुळे घरच्या घरी रूग्णाला कोणत्याही दडपणाशिवाय बरे होण्यास सकारात्मक एनर्जी देखील मिळेल. आणि यामुळे रूग्ण लवकरात लवकर बराही होईल.
घरी उपचार घेणाऱ्या रूग्णांची दवाखान्यांत नोंद ठेवली जाणार आहे. तशी कागदोपत्री नोंदही केली जाणार आहे. याचे योग्य आणि नेटके नियोजन करता यावे यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि सीपीआर प्रशासन काम करत आहे. त्यामुळे येत्या काळात ही सुविधा कोल्हापूरकरांना उपलब्ध झाल्यास त्याचा कोरोना प्रतिबंधास नक्कीच चांगला फायदा होणार आहे.