Categories: Featured आरोग्य

KOLHAPUR: विमानातून आला आणि कोरोना पॉझिटिव्ह निघाला!

  • आज कोल्हापूर जिल्ह्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये दिड वर्षाच्या एका मुलीसह आठ वर्षाच्या आणखी एका मुलीचाही समावेश आहे. या रूग्णांमध्ये आजरा ३,  शाहूवाडी २, तर पन्हाळ्यातील १ रूग्णाचा समावेश आहे.

कोल्हापूर| दिल्ली ते हैदराबाद आणि हैदराबाद ते कोल्हापूर असा विमान प्रवास करून आलेला विमानतळावरील ठेकेदाराकडील कर्मचारीच कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापूर विमानतळावर काल सकाळी हैदराबादवरून विमानातून एकूण १७ प्रवासी कोल्हापूरात दाखल झाले. यामध्ये कोल्हापुरातील ११ तर सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा प्रवासी होते. 

विमानातून आल्यानंतर कोल्हापुरातील प्रवाशांना डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. आज यापैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याने चिंता वाढली आहे. हा प्रवासी मुळचा कानपूरचा असून कोल्हापूर विमानतळाकडे कर्मचारी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे तो कामगार म्हणून काम करतो. तो हैदराबादहून आल्यामुळे त्याला तातडीने रुजू करून घेण्यास विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी नकार दिला. त्यामुळे तो अद्याप रूजू झालेला नाही. 

दरम्यान, त्याचा स्वॅब पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून विमानातून आलेल्या इतरांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मात्र जो पॉझिटीव्ह आहे त्याच्या मागील आणि पुढील सीटवर विमानात कोणीही बसलेले नसल्याची विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News