Categories: सामाजिक

मांडुकली येथील दोघांना कोरोनाची लागण; तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

गगनबावडा | मांडुकली येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. काल उशिरा मिळालेल्या अहवालात या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मांडूकलीसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, मांडुकली येथील ६५ वर्षीय व्यक्ती बायपासच्या ऑपरेशनसाठी कोल्हापूरातील शास्त्रीनगर येथील एका दवाखान्यात उपचार घेत होती. परंतु याठिकाणी एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निदान झाले होते. दवाखान्यातून डिस्चार्ज घेतल्यानंतर रूग्णाला घरी आणत असताना दुर्दैवाने त्यांचा मृत्यु झाला. दवाखान्यातील एका रूग्णाला कोरोना झाल्याने दवाखान्यातील इतरांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये मांडूकली येथील मयत व्यक्ती आणि त्यांच्या सेवेसाठी असणारा त्यांचा भाऊ अशा दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या मयत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट नॉर्मल असल्याचे आधी समजले होते. त्यामुळे त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. 

दुसऱ्या पॉझिटिव्ह व्यक्तीला रात्री (२५ जुलै) गगनबावडा येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. अंत्यसंस्काराला मोजकेच लोक आल्याची माहिती असून अंत्यसंस्कारावेळी ६ जण उपस्थित होते. तर घरी विचारपूस करण्यासाठी शेळोशी, असळज, गगनबावडा येथील नातेवाईक येऊन गेल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संपर्कातील व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी प्रयत्न सुरू झालेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona positive