Categories: आरोग्य सामाजिक

कोरोना : कोल्हापूरकरांनो आता खरी काळजी घ्या; कारण…

कोल्हापूर | राज्यात सर्वाधिक जाचक ठरलेली ई पास प्रणाली रद्द झाल्याने राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे सोपे झाले आहे. मात्र आता ई पास रद्द झाल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन चारची घोषणा करताना ही नवीन प्रणाली जाहीर केली आहे. 

सरकारने आता, जिल्हाबंदी उठवल्याने राज्यभरात कोठेही विनापास प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवासी व्यक्ती जर कोरोना बाधित असेल तर समूह संसर्गाची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून चिंता वाढवणारी आहे. यामुळे आता सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, गरजेचे नसल्यास घराबाहेर न पडणे, गर्दीत जाणे टाळणे यासारखी महत्वाची काळजी घेणे गरजेते ठरणार आहे.  

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम – 
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सक्तीचे नियम लागू करून ही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या २४ तासांतच जिल्ह्यात  ६१७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३५ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७५८ वर गेली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्या १५८३३ इतकी आहे. जिल्ह्यात आजअखेरीस एकूण रुग्णसंख्या २४४१९ असून ७८२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Team Lokshahi News