Categories: आरोग्य सामाजिक

सरकारकडून कोरोना चाचणीच्या दरात कपात; जाणून घ्या नवी किंमत किती?

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने जास्तीत जास्त चाचण्या होणं गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचणीचा दर १ हजार २०० रुपये इतका कमी केला आहे. सध्या आरटीपीसीआर चाचणीचा दर २ हजार २०० रुपये इतका होता. त्याआधी हाच दर ४ हजार ५०० रुपये इतका होता. मात्र, जून महिन्यात सरकारने कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी केले होते.

राज्यातील खासगी लॅब कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे दाखल करण्यात झाल्या होत्या. त्यामुळे खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीचे दर ठरवण्यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली होती. या समितीने खासगी लॅबशी चर्चा करुन चाचण्यांचा दर कमी करण्याचा अहवाल सरकारपुढे मांडला होता. त्यानंतर राज्यात कोरोना चाचणीचे दर २ हजार २०० रुपये इतके करण्यात आले होते. त्यानंतर लॉकडाऊनचा विचार करता समितीने कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करण्याचा अहवाल सरकारपुढे मांडला होता. या अहवालाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीने गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा विचार करुन कोरोना चाचणींचे दर आणखी कमी करण्याचा अहवाल राज्य सरकारपुढे मांडला. अहवाल सरकारपुढे सादर करण्याआधी समितीने खासगी प्रयोगशाळांशी देखील चर्चा केली. या अहवालाला राज्य सरकारने सोमवारी (७ सप्टेंबर) मान्यता दिली. 

आरटीपीसीआर टेस्टचा दर निश्चित करणाऱ्या समितीच्या अहवालानुसार यापुढे खासगी लॅबमध्ये महाराष्ट्रात प्रति व्यक्ती कोरोना चाचणीसाठी १२०० रुपये आकारले जाणार आहेत. कोरोना केंद्रावरुन चाचणीसाठी रुग्णाचे सॅम्पल घेतल्यास १६०० रुपये, तर रुग्णाच्या घरी जाऊन जर टेस्ट करायची असल्यास २ हजार ८०० ऐवजी २००० रुपये आकारले जाणार आहेत. असं राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona test