कोल्हापूर | जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुरवठा विभागातील एका मंडल अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. याचा संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयानेच धसका घेतला असून पुरवठा कार्यालयातील कामकाज तीन-चार दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वीच शाहुवाडी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी पॉझीटीव्ह आल्यानंतर हे संपूर्ण कार्यालयचं क्वॉरंटाईन करण्यात आले होते. तशीच स्थिती पुरवठा विभागात झाली आहे. काल (१५ जुलै) तब्बल १७५ पेक्षा अधिक रूग्ण आढळल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
गेल्या काही दिवसांत शहरात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र ‘मिशन बिगीन’ अंतर्गत सर्व उद्योगधंदे, सरकारी कार्यालये, व अन्य व्यवहार टप्याटप्याने सुरु करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग नियमित सुरु करण्यात आले. परंतु पुरवठा विभागातील मंडल अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने चित्रच बदलले आहे. हे अधिकारी थेट कार्यालयातूनच स्वॅब तपासणीसाठी गेले होते. त्यामुळे कार्यालयातही त्यांचा काहीशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे कार्यालय तीन-चार दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.