कोल्हापूर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुबईमधून आलेल्या पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील एका प्रवाशाला चक्क नाकाबंदी करून ताब्यात घेण्यात आले. यासाठी इस्पूर्ली येथे एसटी बस थांबवून या प्रवाशाला ताब्यात घेऊन तपासणीसाठी सीपीआर रूग्णालयात आणले गेले. दरम्यान या प्रवाशाची मुंबई येथेच सर्व तपासणी केली असल्याचे सांगितल्यानंतर बसमधील प्रवाशांसह तपासणी करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
तोंडाला मास्क, हाताला ग्लोज, सर्व साहित्य झाकलेले अशा अवस्थेतील प्रवाशाला बघून बसमधील अन्य प्रवासी घाबरले. दरम्यान, त्यातीलएच काही प्रवाशांनी या प्रवाशाची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवली नियंत्रण कक्षाने संबंधित मार्गावरील आरोग्य केंद्र आणि पोलीस ठाण्यांना तातडीने सूचना दिली. इस्पुरली (ता.करवीर) येथील येथे नाकाबंदी करून पोलिसांनीही बस थांबवली सर्व प्रवाशांना खाली उतरून नंतर संशयित प्रवाशाला रुग्णवाहिकेतून आरोग्य केंद्रात आणले.
आसपासच्या शहरांमध्ये कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातही दक्षता घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे.