कोल्हापूर | राज्य सरकारच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लागणारे ई-पास रद्द करण्यात आलेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट नाके हटवण्यात आले असून बाहेरून येणाऱ्यांची तपासणी, त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी आता ग्राम समिती व प्रभाग समित्यांवर सोपवण्यात आली आहे. तशा सूचनाच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. आजपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात आंतरराज्य व आंतरजिल्हा हद्दीतील प्रवेश करणाऱ्या नागरिकांची परवाना तपासणी (ई-पास) व आरोग्य तपासणी करण्यासाठी उभारण्यात आलेले चेक पोस्ट नाके बंद करण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे आजपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाता येणार आहे. यामुळे लोकांचे शहर आणि जिल्ह्यात येण्याजाण्याचे प्रमाण वाढणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील प्रभाग समित्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करणे याशिवाय संबंधीतांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी या समित्यांना पार पाडावी लागणार आहे. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिस तपासणी करुन घ्यावी लागणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. जी व्यक्ति तपासणी करुन घेणार नाही किंवा क्वारंटाईन होणार नाही, अशा व्यक्तिंवर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
प्रभाग समित्यांना दिलेली जबाबदारी –
– जिल्ह्याबाहेरून व इतर राज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे
– कोरोना सदृष्य ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांची कोरोना कक्षात तपासणी करून घेणे
– तपासणी अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांना होम क्वारंटाईन किंवा क्वारंटाईन कक्षात अलगीकरण करावे
– कोरोना पाझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तिवर कोरोना कक्षात दाखल करा
– पाझिटिव्ह व्यक्तिच्या कुटूंबियांची तपासणी करावी
– कुटूंबियांना होम क्वारंटाईन करावे
– बाहेरून आलेल्या पण पाझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तिची कुटूंबियांच्या संपर्कातील लोकांची तपासणी व अलगीकरण करावे
– वाहनचालक व वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे
– वाहतूक करणाऱ्यांना अलगीकरणाची व्यवस्था करावी