मुंबई। राज्यात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी कार्यालये पुढील सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी अफवा सोशल मि़डीयावर पसरली होती. परंतु यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत सरकारी कार्यालयांना सुट्टी नसल्याचे सांगितले आहे.
रेल्वे बंद नाही – ठाकरे सरकारची आज कॅबिनेट बैठक होती. या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई लोकल ७ दिवस बंद करण्याबाबत चर्चा झाली. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केल्याने हा निर्णय टळला. मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लोकल रेल्वे बंद केल्यास आणखी पॅनिक किंवा घबराटीचं वातावरण निर्माण होईल असं नमूद केलं. त्यामुळे मुंबई लोकल चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या दोन दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा चर्चा करु अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत देणार आहेत.