Categories: Featured आरोग्य सामाजिक

Corona Effect: सोशल मिडीयावरील एका अफवेने घेतला ३०० जणांचा बळी तर १००० जण अत्यवस्थ

नवी दिल्ली। सोशल मिडीयावर अफवा पसरवणे किती धोकादायक आहे, याचे प्रत्यंतर इराण मधील नागरिकांना आले असून एका अफवेमुळे तब्बल ३०० जणांचा जीव घेतलाय. तर हजारो लोक मृत्युशी झुंजत आहेत. इराणमध्ये सोशल मिडीयावर मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो अशी अफवा वेगाने पसरली, आणि या अफवेला खरे मानून अनेकांनी मिथेनॉलचे सेवन केले. परिणामी ३०० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर १००० पेक्षा अधिक जण आजारी पडले. त्यामुळे सोशल मि़डीयावर कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाबाबतच्या या अफवेने किती गंभीर परिस्थिती निर्माण होते हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. न्यूज वेबसाइट डेली मेलने इराणच्या माध्यमांचा हवाला देत सांगितले की, इस्लामिक रिपब्लिकमध्ये मिथॅनॉलच्या सेवनाने ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १००० लोकं आजारी पडली आहेत. इराणमध्ये मद्यपानास बंदी आहे. मिथेनॉल हा अंमली पदार्थ आहे. मिथेनॉल प्यायल्याने ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची ही बातमी अशावेळी आली जेव्हा तेहरानमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १४४ लोकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

इराणच्या सोशल मीडियावर मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो ही अफवा वेगाने पसरली. लोकांनी यामागचे तथ्य जाणून न घेता ते प्यायले. मिथेनॉलचा वास येत नाही. तसंच त्याला कसलीच चव नसते. मिथेनॉलमुळे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदूला मोठा धोका असतो. ते प्यायल्याने लोकं कोमात जाण्याची शक्यता जास्त असते. इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २ हजार ३७८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ हजार ३०० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Team Lokshahi News