कोल्हापूर। जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा तब्बल १०१ झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने खळबळ उडाली होती. मात्र जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची अधिकृत आकडेवारी १०१ नसून ती ८३ असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अधिकृत आकडेवारी मिळण्यास होत अससेला विलंब आणि यंत्रणांमधील सावळा गोंधळ यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती कळणे दुरापास्त होऊ लागलय.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेल्यानेही खळबळ उडाली आहे. डॉ.डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ३८ वर्षीय तरूणाचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील यांनी दिलीय. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना काल मृत्युचा आकडाही वाढला आहे. इतके दिवस जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक टाळण्यात यशस्वी ठरलेल्या प्रशासनाची यामुळे डोकेदुखी वाढली आहे.
मृत्यु पावलेला तरूण हा पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील असून तो मुंबईतील विलेपार्ले येथून आला होता. रविवारी स्वॅब टेस्ट देण्यासाठी तो हॉस्पिटलच्या रांगेत उभा होता मात्र वेळ झाल्यानं हॉस्पिटल आवारातच झोपला. तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यूनंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसऱ्या बळीमुळे भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
रविवारपासून कोल्हापूरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागलीय.