Categories: आरोग्य सामाजिक

साळवण वनविभागातील ‘त्या’ कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

गगनबावडा | साळवण येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यामुळे साळवण वनविभागातील १० कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणी करण्याची प्रक्रिया आज पार पाडली जाणार असून हे सर्व कर्मचारी ज्यांच्या – ज्यांच्या संपर्कात आले आहेत अशांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहेत. 

याबाबत तालुका तहसिलदार संगमेश कोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कर्मचारी शिरोळ तालुक्यातील अबदुल्लाट येथील आहे. मागील चार दिवसांपूर्वी गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील विभागात कामावर येऊन गेला असून त्यामुळे सध्या विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. याचबरोबर हे कर्मचारी मागील आठवड्यापासून ज्या लोकांच्या संपर्कात आलेत अशांची देखील माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. काल उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनासदृश्य लक्षणे जाणवल्याने त्यांचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. सध्या त्याच्यावर शिरोळ येथील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. 

मे महिन्याच्या दरम्यान गगनबावड़ा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. तालुक्यात आत्तापर्यंत सहा कोरोनाबाधित सापडले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हीच कायम असून वनविभागाचा कर्मचारी शिरोळ तालुक्यातील असल्याने त्यांची गणना शिरोळ मधील कोरोनाबाधितांच्या यादीत आहे.

Team Lokshahi News