Categories: Featured आरोग्य

आ. नितेश राणेंचा आरोप आणि काही तासातच बदली…!

कोल्हापूर। राजर्षी शाहू महाराज शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गजभिये यांना जळगावला पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का घेण्यात आला याबाबत मात्र सीपीआरच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यापूर्वीची त्यांची कारकिर्द देखील वादग्रस्त ठरली होती.

कोरोनाग्रस्तांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह केले जात असल्याचे प्रकरण यासाठी कारणीभूत असल्याची मोठी चर्चा – आमदार नितेश राणे यांनी यांसदर्भात सरकारवर सडकून टीका करत आरोग्य यंत्रणेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका महिलेचा रिपोर्ट सुरवातीला पॉझिटिव्ह दाखवण्यात आला होता. तर एक तासाभराने तो निगेटिव्ह आल्याचे दिसून आले होते. त्याची पुराव्यासहित तक्रार नितेश राणे यांनी २० मे रोजी ट्विटरच्या माध्यमातून केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यामुळे कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या अहवालाबाबतीतही मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. हे प्रकरणच याबदलीला कारणीभूत ठरल्याची अधिक चर्चा आहे. असे असले तरी गजभिये यांच्या बदलीला योगायोग म्हणावा की सरकारने ही बाब खरोखरच गांभिर्याने घेत कारवाई केलीय हा प्रश्न सध्यातरी चर्चेतच आहे.

याबरोबरच गजभिये यांच्याबदलीमागे ही कारणे देखील चर्चिली जात आहेत – जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना, अधिष्ठाता गजभिये आणि जिल्हा शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांचीतील वाद चांगलाच रंगल्याची चर्चा आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने त्यांचे इतर अधिकाऱ्यांशीदेखील मतभेद असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना रूग्णांची संख्या, आणि त्यांच्या आरोग्यविषयक माहिती देण्याविषयी कमालीची अनागोंदी होती. जिल्ह्यातील माध्यमांना कोल्हापूरची कोरोनास्थिती कळावी यासाठी माहिती देणाऱ्या व्हाटस्अप ग्रुपवर तर या अधिकाऱ्यांमधील वाद आणखी चव्हाट्यावर आले होते. यावरून अधिष्ठाता गयभिये यांनी माहिती देणारा हा ग्रुपच बंद करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाला शिस्त लावण्याच्या कारणावरूनही गजभिये यांचे सीपीआर मधील काही अधिकाऱ्यांशी आणि यंत्रणांशी मतभेद असल्याचे बोलले जाते. तसेच अनेक अधिकाऱ्यांनादेखील गजभिये याठिकाणी नको असल्याचे बोलले जाते. या सर्व वादाचे आणि एकमेकातील हेवेदाव्याचे रूपांतर गजभिये यांच्या बदलीत झाल्याची चर्चा सीपीआर परिसरात आहे.

  • डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्यावर ३ वर्षापूर्वी नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये अधिष्ठातापदी कार्यरत असताना एका औषध विक्रेत्याकडून लाच घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देखील सुनावली होती.

डॉ. मिनाक्षी गजभिये यांची सध्या जळगावच्या शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी बदली करण्यात आलीय. त्याचबरोबर अहमदनगरच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना धुळे येथील शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पाठवण्यात आले आहे. 

  • नव्याने नियुक्त डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी यापूर्वीही कोल्हापूर येथे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. त्यांचीही काही कारणास्तव धुळे येथे तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ते उद्या शनिवार (२३ मे) रोजी कोल्हापूरचा पदभार स्विकारणार आहेत.

सध्या कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. सीपीआर रूग्णालय सुरवातीपासूनच यासाठी मोठ्या ताकतीने काम करत आहे. मुंबई, पुणे, आणि इतर जिल्ह्यातून जोपर्यंत लोक येत नव्हते तोपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. परंतु गेल्या आठदिवसात ही परिस्थिती बदलली असून तब्बल २६० रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे आणखी ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Team Lokshahi News