Categories: Featured आरोग्य राजकीय सामाजिक हुणार तरास, पण गुणं हमखास..

दादा.. नक्की घाबरलात कशाला? कोरोनाला की प्रश्नांना – सवाल पुणेकरांचा

पुणे | सुरक्षित अंतर ठेवण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर चांगलेच भडकले. पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसेच म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड केंद्राच्या कामाची पवारांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या फटकळ स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरच्या  नियोजित स्थळाची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने सर्व पक्षीय गटनेत्यांना आमंत्रित केले होते. दरम्यान कारच्या दिशेने येत मनसे नगरसेवक सचिन चिखले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध न करून देण्याच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारबद्दल बोलण्याचा प्रयत्न ते करीत होते. यावर अजित पवार यांनी “लांब राहून बोला, चार मंत्री करोनाबाधित झाले आहेत, असं म्हणत सोशल डिस्टन्सिग पाळा,” असं चिखलेंना सुनावलं. 

  • यावर एवढीच काळजी होती तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलावलाच कशाला. तसेच ऐकून घ्यायचं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अजित पवारांच्या उद्धट वर्तणुकीबद्दल चिखलेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावर सोशल मीडियावर ‘दादा नक्की कोरोनाला घाबरत आहेत कि प्रश्नांना’ अशा नानाविध चर्चांना ऊत आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरे यांनी ‘अजित पवारांकडून नकळत हा प्रकार घडला. चिखले यांनी मास्क लावलेला असल्यानं नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं.’ असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्पष्टीकरणावर ही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. एखादा प्रश्न घेऊन चारदा समोर आलेल्या व्यक्तीला न ओळखणे, वरून अपमान करणे,  म्हणजे थोडक्यात दादांनी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपासून पळ काढणे असाच अर्थ होत असल्याचेही समाजमाध्यमांवर बोलले जात आहे.

Snehal Shankar

Journalist