Categories: कृषी

दत्त दालमिया साखर कारखान्याचा मुजोरपणा, आडसाली ऊसाची नोंद घेण्यास नकार

गगनबावडा | कारखाना कार्यक्षेत्रील ऊस उत्पादकांच्या ऊसाची नोंदच करून न घेण्याचा मुजोरपणा दत्तदालमिया साखर कारखान्याकडून सुरू असल्याचा प्रकार सध्या सुरू आहे. गगनबावडा तालुक्यातील साळवण गट ऑफिसवर आडसाली ऊसाची नोंदणी करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना हा अनुभव आला असून तुमच्या गावात दत्त दालमिया साखर कारखान्याची ऊस तोड टोळी नसल्याने नोंद करणार नाही असे कारण शेतकऱ्यांना दिले जात आहे. 

गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले गावचे शेतकरी दत्त दालमिया साखर कारखान्याला ऊस पुरवठा करतात. हे शेतकरी आपल्या आडसाल ऊसाची नोंद करण्यासाठी कारखान्याच्या साळवण येथील गट ऑफिस मध्ये गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी ऊस नोंद करायचा असेल तर काही ठराविक कंपनीचे खत खरेदी करावे लागेल असे सांगितले. शेतकऱ्यांनी खत घेण्याची तयारी दाखवल्यानंतर मात्र एका कर्मचाऱ्याने तुमच्या गावात आमच्या साखर कारखान्याची ऊस तोडणी टोळीच नसलेने तुमची ऊस नोंद घेता येणार नसलेचे सांगून शेतकऱ्यांची नोंद घेतली नाही.  दत्त दालमिया साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या या वर्तणुकीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात नाराजी पसरली असून कारखाना प्रशासनाच्या या मुजोरपणाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.  

याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता, कारखाना प्रशासनाने गावातील लोक ऊस तोड करण्यास तयार असतील तर आम्ही नोंद घेत असल्याचे सांगितले. सध्या पूर्वीसारख्या परजिल्ह्यातील ऊस तोड टोळ्या येत नाहीत, त्यामुळे गावातील ८ ते १० शेतकरी एकत्र येऊन ऊस तोड करून कारखान्यास पाठवतात. ज्या गावातील शेतकरी अशा टोळ्या करतात त्याच शेतकऱ्यांची सध्या ऊस नोंद घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर ऊस उत्पादकता वाढ या अनुषंगाने खत घेण्यास सांगितले जात असल्याचेही मान्य केले.

असे असले तरी कारखाना प्रशासनाने ऊस तोडणीसाठीचे नियोजन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भरवशावर न सोडता, स्वतः करणे गरजेचे आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसच जर तोडून नेणार नसतील तर असे कारखाने शेतकऱ्यांच्या काय कामाचे असा प्रतिप्रश्नच शेतकरी वर्गातून विचारला जाऊ लागलाय. त्याचबरोबर ऊस उत्पादकता वाढ या अनुषंगाने ठराविक एखाद्या कंपनीचेच खत घेण्यास सांगणे हा देखील सरळ सरळ गैरप्रकार असून शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Team Lokshahi News