नवीदिल्ली। बॉस्केटबॉलमधील सर्वात महान खेळाडू कोबी ब्रायंटच्या मृत्युमुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. या अपघातात त्याच्या १३ वर्षीय मुलगी गियेनाचाही मृत्यू झालाय. गियेना देखील एक बास्केटबॉलपटू होती. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हेलिकॉप्टर अपघातात या बापलेकीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये कोबीचा समावेश होता. २० वर्षाच्या करिअरमध्ये कोबीने पाच वेळा एनबीए चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. बास्केटबॉलमधील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवणाऱ्या कोबीने एका पत्राद्वारे ऑस्कर पुरस्कारही पटकावला होता.
कोबीने १८ वेळा एनबीएचा ऑल स्टार हा किताब मिळवला होता. तर २००८ मध्ये एनबीएचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले होते. त्याने एनबीए फायनलमध्ये एमव्हीपी का किताब दोन वेळा मिळवला. २००८ बिजिंग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने देशाला सुवर्णपदकही मिळवून दिले होते. २००६ मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात ८१ गुण मिळवले होते. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम खेळी होती.
बास्केटबॉलपटूमधील पाच महान खेळाडूंची नाव घ्यायची झाल्यास त्यात कोबी ब्रायंटचे नाव आघाडीवर घेतले जाते. फक्त अमेरिका किंवा बॉस्केटबॉल लोकप्रिय असणाऱ्या देशांतच नव्हे तर भारतातील अनेक क्रीडा आणि सिने क्षेत्रातील व्यक्तींनीही कोबीला श्रद्धांजली वाहिली आहे. यात प्रिती झिंटा, करन जोहर, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आदींचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील कोबी ब्रायंटला ट्विटववरून श्रद्धांजली वाहिली आहे.
कोबीच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियावर १० पैकी सर्व ट्रेंड कोबी ब्रायंट संदर्भातील होते. यावरून कोबीच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. कोबी बास्केटबॉल कोर्टमधील एक महान व्यक्ती होता. आयुष्यातील दुसऱ्या एका डावाला सुरूवात करणार होते. गियेनाच्या निधनामुळे एक पालक म्हणून अधिक दुखदायक आहे. मी आणि मिशेल ब्रायंट परिवारासोबत आहोत, असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कोबी आणि गियेनाच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटले आहे.