Categories: Featured राजकीय

दिल्लीत पुन्हा ‘आप’, भाजपला दिल्लीकरांनी नाकारले – Exit Poll

नवी दिल्ली। नवी दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान पार पडलं असून आता वेगवेगळ्या वाहिन्यांचे आणि वृत्तसंस्थांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. सर्वच एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये ‘आप’ला बहुमत मिळताना दाखवले आहे. भाजपला मोठा फटका बसणार असून त्यांना अपेक्षित जागाही मिळताना दिसत नाहीत. तसेच काँग्रसेचं दिल्लीत पुन्हा पानीपत होताना या एक्झिट पोलमधून दिसत आहे. 

दिल्लीत आज एकूण ७० जागांवर मतदान झाले. दिल्लीत ५५ टक्क्याहून अधिक मतदान झाल्याने राज्यात कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, सर्वच वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलमुळे राज्यात पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचंच सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार आपला ४७ तर भाजप आघाडीला केवळ २३ जागा मिळताना दिसत आहेत. एबीपी सीव्होटर्सच्या सर्व्हेनुसार आपला ५६, भाजप आघाडीला १२ आणि काँग्रेस आघाडीला केवळ दोन जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. तर जन की बातच्या सर्व्हेत आपला ५५ आणि भाजप आघाडीला केवळ १५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

Team Lokshahi News