Categories: बातम्या

कोल्हापूर : ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ लागू करा – AISF ची मागणी

कोल्हापूर | शहीद भगतसिंग यांची जयंती, ऑल इंडिया स्टूडंट्स फेडरेशनच्यावतीने बिंदू चौक येथे आकाशात फुगे सोडून साजरी करण्यात आली. यावेळी “भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा” लागू करण्याची मागणी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केली. 

ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन, नॅशनल कौन्सिलच्या वतीने आज देशभर भगतसिंग यांची जयंती साजरी केली जात आहे. यावेळी BNEGA ACT ची मागणी करून आकाशात फुगे सोडून राष्ट्रव्यापी कॉल देण्यात आला. “सबको शिक्षा, सबको काम”- वरना होंगी, नींद हराम” व “भगतसिंग रोजगार हमी कायदा लागू करा”, तसेच “भगतसिंग जिंदाबाद” BNEGA Act लागू करा, या घोषणाही देण्यात आल्या. 

यावेळी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली. सध्या देशात मोठ्या प्रमाणात बेकारीचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या नावाखाली मोदी सरकार जनतेमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करत आहे. जनतेची सर्वच बाबतीत दिशाभूल सुरू असून सरकार मोठ-मोठ्या उद्योगपतींना जवळ करत आहे. यामुळे गोरगरिबांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने खाजगीकरण करत बऱ्याच शासकीय संस्था देशोधडीला लावल्या आहेत. दिवसेंदिवस उद्योग, व्यवसाय ठप्प होत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबतीत सध्याचे सरकार मात्र  दुर्लक्ष करत असून केवळ भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे संसदेत संमत केले जात असल्याचा आरोप केला. 

यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी, जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे, जिल्हा सचिव धिरज कठारे, AIYF च्या जिल्हाध्यक्षा आरती रेडेकर, स्नेहल माने, हर्षवर्धन कांबळे, योगेश कसबे, सुनील कोळी, नेहा कठारे, पंकज खोत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Lokshahi News