Categories: कृषी सामाजिक

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पंढरपूर | गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. अशा परिस्थितीत नुकसानभरपाई पासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही याची दक्षता घेत सरसकट पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडे नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईसाठी निधी मागणीसाठी प्रस्ताव पाठण्यात येणार असल्याचेही सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. तसेच नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी आणि नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकारी वर्गाला केल्या. 

यावेळी पवार यांनी, पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, कासेगांव येथील गावांना भेट दिली. याठिकाणी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे आणि भीमा नदीला पूर आल्यामुळे अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे, यासाठी आवश्यक तेथे पूल बांधणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. महापुरामुळे नदीकाठचे वीज रोहित्रे, वीजेचे पोल, पाण्यात वाहून गेल्यामुळे नदी काठच्या गावांची  वीज खंडीत झाली आहे. महावितरण कंपनीने तात्काळ अधिकचे कर्मचारी उपलब्ध करुन वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशा सुचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Team Lokshahi News