Categories: ब्लॉग

‘अभिनव’ कामगिरी करून डॉ. देशमुख निघाले पुण्याला..!

बिष्णोई टोळीशी झालेल्या चकमकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतील तुमचे पाणावले डोळे, कर्मचाऱ्यांच्या काळजीने कातरलेला स्वर, आणि सहकाऱ्यांनी गोळ्या अंगावर झेलत केलेली अभिमानस्पद कामगिरी सांगताना तुम्हाला उर भरून आलेलं चित्र कोल्हापूरकर कधीही विसरणार नाहीत. महापुराच्या संकटातही चोरट्यानी अनेकांची घरे फोडली. या चोरट्याना जेरबंद करून सौभाग्याचे अलंकार ज्याचे त्यांना परत करताना महिलांना फुटलेला हुंदका आजही तुमच्या कामाची पोचपावती देतोय. महापुरात 20-22 तास काम करताना अनेकांना अधिकारीपद विसरून तुम्ही केलेली मदत कोल्हापूरकर विसरणार नाहीत. तुमची बदली झाली मात्र तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचण्याचे स्वप्न या गणेशोत्सव काळात कोल्हापूरकराना पूर्ण करता आले नाही याची सल मात्र कायम राहील.

बदली हा प्रक्रियेचा भाग आहे. आज तुम्ही जाताय, आम्हाला अडवता येणार नाही. मात्र आज अनेक माता भगिनींचे संसार तुम्ही वाचवलेत त्यांच्या भावना मात्र अडवता येत नाहीत. या भावनांच्या शिदोरीसह तुम्हाला कोल्हापूरकरांचा निरोप असेल..

साहेब, नावाप्रमाणे तुम्ही अभिनव कामगिरी केलात. पोलिसांवर हात उगरणाऱ्यांना थेट आत,गोळीला गोळीने प्रत्युत्तर,तर अवैध धंदेवाल्यांचे योग्य ‘ऑपरेशन’अशी अनोखी कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांची कोल्हापुरातून पुण्याला बदली झाली. मात्र कोल्हापुरात त्यांनी केलेल्या कामाची दखल कोल्हापूरकरांच्या मनात कायम राहील.

पोलिसांवर कायदा आणि सुवस्था राखण्याची जबाबदारी असते. मात्र ती शांततेत राहावी यासाठी प्रत्येक अधिकारी आपली स्टाईल वापरत असतो. शिक्षणाने डॉक्टर असलेल्या अभिनव देशमूख यांनीही कोल्हापुरात आपली स्टाईल वापरत योग्य ऑपरेशन केले. कोल्हापूर जसे आंदोलनाचे, चळवळीचे ठिकाण तसेच अवैध व्यवसायाचे गुंडाच्या आश्रयाचे ठिकाणही बनले होते. आणि हेच आव्हान घेऊन देशमुख कोल्हापुरात आले.
या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेली हिंसक आंदोलने हाताळली, भीमा कोरेगाव दंगलीनंतर कोल्हापूरात झालेला उद्रेक हाताळला, महापूर हाताळला, लोकसभा विधानसभा निवडणूक, बिष्णोई टोळीला तर गोळीला गोळीने उत्तर देऊन जे राजस्थान पोलिसांना जमले नाही ते करून दाखवले. शांत, संयमी स्वभाव आणि नियोजनाने त्यांनी कोल्हापूरवरची अनेक संकटे दूर केली.

एका बाजूला त्यांचा मृदू स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला कडक स्वभाव असे दोन्ही स्वभाव कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाले. पोलिसांच्यावर हात उगरणाऱ्यांना आणि पोलीस दलाची बदनामी करणाऱ्या आपल्याच खात्याच्या लोकांना सरळ करण्याची त्यांची मोहीम हटके ठरली. ऐश्वर्या शर्मा यांच्यासारख्या महिला पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या माजी उपमहापौरांच्या टोळीवर त्यांनी केलेली कारवाई अनेकांना धडकी भरवणारी ठरली. मटका बुकींचे कंबरडे मोडून मुंबईतून सुरू असलेला मटका बंद करण्याची वेळ त्यांनी कोल्हापुरातून आणली. अनेक गुन्हेगारांनी त्यांच्या काळात भूमिगत होणे पसंद केले इतकी त्यांच्या कारवाईची दहशत होती. खून, दरोडे, चोरी याची डिटेक्शन करून अनेक गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी केला. तर बनावट नोटा छापणे, शस्त्र बाळगणे अशा अनेकांवर कारवाई करत देशहिताचे कार्य केले.
तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

Dnyaneshwar Salokhe‎, (लेखक जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत पत्रकार आहेत)

Team Lokshahi News