Categories: राजकीय सामाजिक

मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात ‘का’ युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितल कारण

मुंबई | मराठा आरक्षण प्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारने सांगितल्यानुसार मी न्यायालयात युक्तिवाद केला नाही असं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितलं आहे. “तत्कालीन फडणवीस सरकारने सांगितल्याप्रमाणे २०१९ च्या सुनावणीत आपण न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडली नाही. असं असलं तरीही कागदोपत्री सरकारची बाजू भक्कम करण्याचे काम आपण यावेळी केलं” असंही कुंभकोणी यांनी स्पष्ट केलं आहे. 

  • जानेवारी २०१९ च्या दरम्यान, सोलापुरात मराठा संघटनांनी बैठक घेऊन मराठा आरक्षण प्रकरणी ज्येष्ठ वकील आणि माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांनीच सरकारची बाजू मांडावी असा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे या प्रकरणात विशेष वकील म्हणून व्ही. ए. थोरात यांना नेमण्याचा निर्णय तेव्हाच्या सरकारने मला सांगितला. त्यांच्या निर्णयाचा मान ठेवून मी न्यायालयात बाजू न मांडण्याचा निर्णय घेतला.

आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण प्रकरणी सरकारचा पराभव झाला असा आरोप होतो आहे. यावर कुंभकोणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आपण न्यायालयात न जाता सरकारची बाजू भक्कम करण्याचे जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माझे आभार मानले होते. न्यायालयात बाजू मांडली नसली तरी मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार करणे, न्यायालयात लेखी युक्तिवाद तयार करणे, प्रतिज्ञापत्रं तयार करणं, बैठकांचे आयोजन करणे ही कामं मी केली होती. त्यावेळी थोरात यांनीही माझ्या कामांची प्रशंसा केली होती” असंही कुंभकोणी यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आलं आहे. त्यावरुन महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात कुंभकोणी यांनी हा खुलासा केला आहे. 

Team Lokshahi News