Categories: Featured सामाजिक

#धा रुपायचं चिकन.. अन् ‘ती’

नितीन थोरात

#धा_रुपायचं_चिकन
‘मला धा रुपायचं चिकन द्या.’ चिमणा नाजूक आवाज कानावर पडला तसं मी चमकून पाहिलं. चिकनवाल्याच्या चेहऱ्यावरही प्रश्न दिसला. चिकनवाला हसत म्हणाला, ‘घरी मांजराचं पिल्लू आणलं का कुत्र्याचं ?’ मी स्मित करत पाहिलं. अवघ्या सात आठ वर्षांची पोरगी उभी होती. अंगावर जिल्हा परिषेदेच्या शाळेचा निळा फ्रॉक. तांबरलेले केस, लाल रबर, पायात स्लीपर. चेहऱ्यावर उदास भाव. माझ्याकडं घाबऱ्या नजरेनं पाहत तिनं कडाप्प्यावर दहाची नोट ठेवली आणि पुन्हा म्हणाली, ‘धा रुपायचं चिकन द्या मला.’

आता तिच्या डोळ्यात पाणी होतं. डोळे काठोकाठ भरलेले. आपण काही बोलावं तर ती रडेल असच वाटलं. चिकनवाल्यानं तिच्याकडं रागानं बघत विचारलं, ‘अगं धा रुपायचं चिकन पायजे पण कुणाला? मांजराला का कुत्र्याला?’ चिकनवाल्याचा रगील आवाज कानावर आला, तसा तिच्या डोळ्यातला टपोरा थेंब गालावर घरंगळला. क्षणात थेंब पुसत ती म्हणाली,‘पप्पांला पायजे. ते म्हणत्यात मला चिकन खायचं. आईकडं नाय पैशे. हे मी साठवल्याले पैशेहेत. धा रुपयाचं चिकन पायजे.’ चिकनवाला हसत म्हणाला, ‘दारु पिऊन आल्याला दिसतोय तुझा बाप. जा घरून आजून पैशे आण. धा रुपायचं नाय येत चिकन.’ आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचा बांध फुटला. नाक पुसत, रडण्याचा आवाज न करता ती जाग्यावर हमसायला लागली. ‘नको पप्पा मारत्यान. धा रुपायचं चिकन द्या’ तशी मी खिशातून वीसची नोट काढली आणि तिला देत म्हणालो, ‘हे घे. तीस रुपायचं घे चिकन.’ रडवेल्या डोळ्यानी माझ्याकडं पाहत ती म्हणाली, ‘नको. लोकांचे पैशे घेतले की पप्पा मारत्यान. मला धा रुपायचंच चिकन पायजे.’ आता काय बोलावं कळेना. तोच चिकनवाल्यानं दहाची नोट घेतली आणि म्हणाला, ‘बर बाई बर. हो शांत. देतो तुला धाचं चिकन.’

पोरीनं इवल्याशा गळ्यातून आवंढा गिळला. चिमुकल्या हातानी दोन्ही गाल पुसले आणि हुंदके देत एकटक समोरच्या काउंटरकडं पाहत राहीली. चिकनवाल्यानं वजनकाट्यावर तीस रुपयांच चिकन केलं आणि काळ्या पिशवीत भरुन तिला दिलं. तशाच फुगलेल्या गालानी ती पोरगी रस्ता ओलांडत निघून गेली. मी वीसची नोट कडाप्प्यावर ठेवली तसा चिकनवाला म्हणाला, ‘रावद्या की साहेब. थोडं पुण्य आम्हालाबी कमवुद्या की.’
स्मित करत माघारी वळालो.
बापाचा व्यसनी हट्ट पुरवणारी, आईला मारहाणीपासून वाचवणारी, दुनियेच्या कर्जातून स्वताला लांब ठेवणारी, प्रेमाने साठवलेल्या पैशांला प्रेमासाठीच उधळणारी इवलीशी मायमाऊली घराकडं निघाली होती.
ती पोरगी होती.
ती बाई होती.
आईबापाच्या संसाराला तारणारी, त्यांची आई होती.

Team Lokshahi News