Categories: राजकीय

धनंजय महाडिक… राष्ट्रवादी पुन्हा..?

मुंबई | भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने धनंजय महाडिक ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ म्हणत असल्याच्या चर्चेने कोल्हापूरात जोर धरलाय. महाडिक यांनी मुंबईत गुरूवारी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला आहे. 

गेल्यावर्षी महाडिक यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविली होती, परंतु पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जाते. पराभवानंतर त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले होते. त्यानंतर भाजपने महाडीक यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली होती, असे असताना यंदाच्या नवीन कार्यकारिणीत मात्र महाडिक यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावरून बाजूला करून त्यांच्याकडे साखर कारखानदारी संदर्भात पक्षीय जबाबदारी सोपवली आहे.

सध्या धनंजय महाडिक आणि सुप्रिया सुळे यांच्या मुंबईतील भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात असून जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी या भेटीचा कोणताही संदर्भ दिला नसून केवळ माजी खासदार धनंजय महाडीक यांनी भेट घेतली. #latepost असा उल्लेख केला आहे. 

दरम्यान, याबाबतीत धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरुवारी मंत्रीमंडळ बैठकीत साखर कारखान्यांच्या थकहमी संदर्भात चर्चा होणार होती. त्यासाठी राज्यातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, पदाधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेलो होतो. परंतु पवार यांनी दिलेल्या वेळेत पोहचू शकलो नसल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर मधील कार्यालयात सुप्रिया सुळे उपस्थित असल्याचे कळाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेलो. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही यावेळी महाडिक यांनी स्पष्ट केले.

Team Lokshahi News