कोल्हापूर। आमदार चंद्रकांत जाधव हे नामधारी असून ते केवळ ताराबाई पार्कातून आलेल्या पत्रकावर सही करण्याचे काम करतात अशी टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. जाधव यांनी केलेल्या टीकेला आज महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या भाषणात प्रत्युत्तर दिले.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी आपण पेठेतील असल्याचा इशारा महाडिक यांना दिला होता. “शिवाजी पेठ ही आमची अस्मिता आहे, कोल्हापूरची शान आहे. आम्हाला कोल्हापुरातील पेठांचा अभिमान आहे. शिवाजी पेठ खेळाडूंसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. कृषी प्रदर्शन रद्द झाल्यास वैयक्तिक धनंजय महाडिक यांचं काही नुकसान होणार नाही तर यामध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांचे नुकसान होईल आणि त्यामुळे मिळणाऱ्या शापास आमदार जबाबदार असतील.” असा टोला यावेळी बोलताना महाडिक यांनी लगावला.
“मी कोणतही अधिकच भाष्य केलेलं नसताना आमदारांनी मोठं पत्रक काढलं, त्यामध्ये त्यांचा दोष नसून त्यांना ताराबाई पार्कमधून आलेलं पत्रक त्यांनी सही करून दिल असेल. पुढील पाच वर्ष हेच होताना दिसेल, सत्ता आहे तोवर तुम्ही असं वागू शकता मात्र आमची सत्तादेखील येणार हे लक्षात ठेवा.” असे खडे बोल सुनावत आपले कुटुंब हे खेळाडू घराणे असल्याचा दाखला धनंजय महाडिक यांनी दिला. यापुढे आमदार जाधव यांनी पत्रक काढण्याऐवजी शहराला मिळणाऱ्या विषयुक्त पाण्यातून मुक्त करावे असं जाहीर आवाहन माजी खासदार महाडिक यांनी केलं.