Categories: सामाजिक

गगनबावडा तालुक्यात दूरसंचार सेवेचा बोजवारा; ‘डिजीटल इंडिया’ हे केवळ स्वप्नचं..!

गगनबावडा |कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम तालुका ही गगनबावडा तालुक्याची ओळख. तालुक्याची ही ओळख आणखी ठळक करण्याचे काम डिजीटल भारताच्या युगात बीएसएनएल कंपनीकडून अत्यंत इमाने इतबारे पाडले जात आहे. कोरोनाच्या काळात सर्व जग मोबाईल आणि इंटरनेट सेवेच्या माध्यमातून अत्यंत वेगवान पध्दतीने एकमेकांशी जोडले जात असताना गगनबावडा तालुक्यातील जनतेला मात्र बीएसएनएल सारख्या कंपनीच्या सुमार दर्जाच्या सेवेमुळे जगापासून अलिप्तच राहावे लागत आहे. मोठा गाजावाजा करत दाखल झालेल्या जिओ कंपनीची सेवादेखील बीएसएनल पेक्षा सुमार दर्जाची असल्याने लोकांची चांगलीच पंचायत होत आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना डिजीटल भारताच्या नारा देणाऱ्या माननिय पंतप्रधानांच्या स्वप्नांनाच या कंपन्या सुरूंग लावत असून मोबाईल सेवा ठप्प होणे, इंटरनेट सेवेचा पत्ताच नसणे असले प्रकार घडत आहेत. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यासाठी फोन करायचा म्हणटला तरी तो लागत नाही, चुकून लागलाच तर अधिकारी फोन उचलत नसल्याची तालुक्यातील लोकांची तक्रार आहे. एखाद्या वेळेस कुणाचा फोन उचलला गेलाच तर  टॉवरची कपॅसिटी वाढवणार आहे, सध्या लॉकडाऊनमुळे मोबाईल सेवेचा वापर वाढल्याने इंटरनेट सेवा कोलमडत आहे अशी उत्तरे दिली जात आहे. असे असले तरी लॉकडाऊन पूर्वीदेखील अशीच परिस्थिती होती आणि आताही तीच असल्याने लॉकडाऊन हे केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यास निमित्त सापडल्याचे तालुक्यातील लोकांचे म्हणणे आहे.

सध्या लहान मुलांच्या शाळांपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी गगनबावडा तालुक्यात असलेल्या मोबाईल तसेच दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याच्या सुमार दर्जाच्या सेवेमुळे सध्यातरी ऑनलाईन शिक्षण दूरच राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थांचे मोठे नुकसान होत असून शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. तालुक्यात ज्या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याचे टॉवर सुरू आहेत ते शनिवार रविवार शासकीय सुट्यांप्रमाणे हमखास बंदच असल्याचे चित्र आहे. यासर्व परिस्थीतीत याबाबत तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण होत असून, तालुक्यातील लोकांचा संपर्क सुसह्य होण्यासाठी कोण लक्ष घालणार हे मात्र कुणालाच कळेनासे झाल्याचे चित्र आहे.

Team Lokshahi News