Categories: आरोग्य सामाजिक

साळवण ग्रामस्थांना इम्युनिटी बुस्टर डोसचे वाटप

गगनबावडा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील साळवण ग्रामपंचायतचे सरपंच संजय पडवळ आणि हनुमान तालीम मंडळ यांच्यावतीने स्वखर्चाने साळवण ग्रामस्थांना इम्युनिटी बुस्टर डोसचे घरोघरी वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र सिध्दगिरी कणेरी मठ यांच्यावतीने जिल्ह्यातील लोकांसाठी हा इम्यूनिटी बुस्टर डोस उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचे वाटप प्रत्येक ग्रामपातळीवर झाल्यास कोरोनाविरूध्दच्या लढाईला बळ मिळणार असल्याचे मत यानिमित्ताने साळवणचे सरपंच संजय पडवळ यांनी व्यक्त केले. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारक क्षमता वाढवणे आणि ती टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. कणेरी मठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या इम्यूनिटी बुस्टर डोस मुळे लोकांची प्रतिकारक्षमता वाढीस लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घरोघरी प्रत्येकानी त्यांच्या वयोमनानुसार याचे सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे, कणेरी मठाच्यावतीनेही सांगण्यात आले आहे. 

सध्याच्या घडीला अद्यापही कोव्हिड १९ ला १०० टक्के प्रतिबंधात्मक अशी कोणतीही लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. जगभरातील संशोधक कोविड प्रतिबंधात्मक लस शोधण्यात रात्रंदिवस झटत आहेत. परंतु अद्यापही त्याला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी रोगप्रतिकारकक्षमता वाढवणे, ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे.   

Team Lokshahi News