कोल्हापूर | जिल्हा प्रदुषण नियंत्रण महामंडळच पंचगंगा आणि जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया साखर कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी थेट कासारी नदीतून पंचगंगेत येत असल्याने याला प्रदूषण नियंत्रण महामंडळच जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील शेतकरी वर्गाने केला आहे.
कोल्हापूर जिल्हा हा साखर कारखानदारीचे आगार समजला जातो. जिल्ह्यातील सहकारी कारखानदारीबरोबर सध्या खाजगी साखरकारखानदारी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु हे साखर कारखाने बऱ्याचदा सर्व नियम पायदळी तुडवून मनमानी पणे आपली कारखानदारी करत आहेत. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखाना देखील सध्या हाच प्रकार करत असून कारखान्यातून निघणारे दूषित पाणी थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. परंतु कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यात असं कोणतं नात आहे ज्यामुळे याची दखलच घेतली जात नाही, हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे.
एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीचा विचार करता दत्त दालमिया हा शेतकऱ्यांना चांगला दर देणारा कारखाना म्हणून प्रसिध्द आहे. असे असले तरी कारखान्याची दुसरी काळी बाजू मात्र जिल्ह्यातील पर्यावरणालाच घातक ठरत आहे. दूषित पाणी व हवेमुळे कारखाना परिसरातील लोकांना साथीचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचा रोग यासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतजमीनी नापीक होत असून शेतात काळे पाणी उतरत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे देखील स्वतःचे अस्तित्व हरवून बसल्यामुळे कारखान्यातून बाहेर पडणारे काळेकुट्ट दूषित पाणी कासारी नदीपासून थेट पंचगंगा नदी काठावरील गावांमध्ये प्रदूषण करत आहे. त्यामुळे जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळच पंचगंगा नदीचे मारेकरी ठरत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.