Categories: आरोग्य बातम्या सामाजिक

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कोविड केअर सेंटर मधील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा

कोल्हापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या उपचारात तालुका पातळीवर कार्यरत असणाऱ्या कोविड सेंटर मधील कंत्राटी डॉक्टर व नर्स यांना गेले दोन महिने वेतन आणि आवश्यक त्या सोईसुविधाच पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांनी कामबंद आंदोलनांचे हत्यार उपसले आहे. आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्ययंत्रणेची अशी दुरावस्था सुरू असल्याने कोरोनाग्रस्तांच्या जिवाशी अक्षरश: खेळ सुरू असल्याचेच यावरून दिसत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ध्यानात घेत तालुका पातळीवर कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु या कोविड सेंटरवर असणाऱ्या अपुऱ्या सोईंमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. असाच प्रकार सध्या आजरा येथील कोविड सेंटरच्या बाबतीत सुरू आहे.  सेंटर वरील कंत्राटी डॉक्टर व नर्सना गेले दोन महिन्याचे वेतन आणि सोयीसुविधा न मिळाल्याने  त्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे आजरा तालूक्यातील कोरोना रुग्णांच्या आरोग्याचं काय असा प्रश्न आता विचारला जात आहे.

या स्टाफला हलक्या दर्जाचे मास्क, हॅन्डग्लोज मिळतात असा आरोप येथिल कर्मचारी यांनी केला आहे. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टर आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र आम्हाला साध्या साध्या गोष्टीही मिळत नाहीत. वरिष्ठांना सांगूनही फक्त आश्वासने दिली जातात असा आरोपही इथल्या डॉक्टरांनी केला आहे.

विशेष म्हणजे आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार कोल्हापूर जिल्ह्यातील राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडेच आहे. असे असतानाही जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Team Lokshahi News