Categories: बातम्या शिक्षण/करिअर

शिवाजी विद्यापिठाच्या कुलगुरू पदी डॉ. डी. टी. शिर्के यांची निवड

कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठाचे १३ वे कुलगुरू म्हणून सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६) डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ १७ जून रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. यादरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. नवीन कुलगुरू पदासाठी राज्यपालांनी डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ. अश्विनी कुमार नांगिया आणि राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर हे समितीचे अन्य सदस्य होते. निवड समितीकडे आलेल्या १६९ अर्जातून २८ जणांची पहिली यादी तयार करण्यात आली. त्यानंतर समितीने त्यांच्या मुलाखती घेऊन पाच जणांची अंतिम यादी बनवली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या राज्यपाल कोश्यारी यांनी मुलाखती घेतल्या. त्यानंतर आज डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

डॉ. दिगंबर शिर्के हे मुळचे हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फ वडगाव येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस.सी केले असून शिवाजी विद्यापीठातूनच एम.फील आणि पी.एचडी केली आहे. शिक्षण घेतल्यानंतर ते याच विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. डॉ. शिर्के यांनी विभागप्रमूख, प्रभारी कुलसचिव, प्र-कुलगुरू या पदांवर काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्राचा चांगला अनुभव आहे.

Team Lokshahi News