नवी दिल्ली | दरवर्षी सणांच्या कालावधीत डाळी महाग होत असल्याची बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली असून या काळात डाळींची आयात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. जवळपास पाच लाख टन डाळींची सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आयात केली जाणार आहे.
डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटीने २०२०-२१ साठी उडीद आणि तूर डाळींची आयात कोटा यादी जारी केली आहे. यानुसार चार लाख टन तूरडाळ आणि सुमारे दीड लाख टन उडीद डाळ आयात केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ही तूर डाळ आयात करण्याची परवानगी दिली आहे.
यंदाच्या अति पावसामुळे तूरीचेउत्पन्न दहा टक्क्यांनी कमी होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात तूर आणि उडीद डाळ यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. एक महिन्यापुर्वी ८० ते ९० रुपये किलो दराने मिळणारी तूर डाळ आता २० ते २५ रुपयांनी महाग झाली आहे. मागील अहवालानुसार, सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबर २०१९ पर्यंत १८.७ लाक टन डाळीची बाहेरून खरेदी केली होती. तर २०१८-१९ मध्ये २५.३ लाख टन डाळ आयात केल्याची माहिती आहे.